---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात भीषण आगीची घटना समोर आली होती. या आगीमुळे पापा नगर आणि काजी प्लॉट परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला पापा नगर भागातील एका घराला आग लागली आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे ही आग झपाट्याने पसरली आणि आजूबाजूच्या आणखी दोन घरांनाही तिचा फटका बसला.
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी एकच धावपळ केली. घरातील सदस्यांनी वेळीच बाहेर पडत जीव वाचवला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, गजबजलेल्या वस्तीत आग लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि परिसरात मोठा गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन ते चार बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात घेता जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोर्चा सांभाळला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले आणि आणखी मोठे नुकसान टळले. मात्र, या आगीत काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेनंतर काजी प्लॉट परिसरातही परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता पाहणी करण्यात आली. राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबांवर मोठे संकट ओढवले असून त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी संबंधित प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. बाधित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अग्निशमन दलाने वेळेत आगीवर नियंत्रण मिळवून मोठा अनर्थ टाळल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष कौतुकही केले.









