---Advertisement---
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे अंडाशय (ओव्हम) तस्करीचे आंतरराज्य रॅकेट उघडकीस आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकर हिला पोलिसांनी अटक केली असून तिच्यासह उल्हासनगर येथील अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे आणि इतर तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या रॅकेटद्वारे बदलापूर परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून अंडाशय विक्रीस प्रवृत्त केले जात होते. प्रत्येक अंड्यामागे महिलांना सुमारे २० हजार रुपये दिले जात होते, तर मध्यस्थ महिलांना प्रत्येकी ३ हजार रुपये कमिशन मिळत होते. या प्रकरणात ३०० हून अधिक महिला पीडित असल्याचा अंदाज आहे.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, गोळा केलेली अंडी केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील आयव्हीएफ केंद्रांमध्ये विक्रीसाठी पाठवली जात होती. मात्र या संपूर्ण जाळ्याबाबत पोलिसांनी अधिकृतरीत्या भाष्य करण्यास नकार दिला आहे.
मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकर ही बदलापूरमधील खरवई परिसरातील नॅनो सिटी येथील सी-विंगमधील फ्लॅट क्रमांक ९०३ मध्ये राहत होती. ती महिनाभरापूर्वीच येथे राहायला आली होती. पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली असता गर्भाशयासाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन्स, सोनोग्राफीचे फोटो, महिलांची छायाचित्रे, खोटी प्रतिज्ञापत्रे व अन्य संशयास्पद कागदपत्रे जप्त केली.
गरजू महिलांना बेकायदेशीररीत्या हार्मोनल इंजेक्शन्स देऊन अंड्यांची वाढ केली जात असल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित महिलांना आयव्हीएफ केंद्रात पाठवून शस्त्रक्रियेद्वारे अंडे काढण्यात येत होते आणि त्यांची विक्री केली जात होती.
या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अनियमितता आणि गरिबीचा गैरफायदा घेणाऱ्या रॅकेटबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पोलिस तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









