---Advertisement---
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातील बाजारपेठांवर दिसू लागला आहे. महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातही त्याची झळ जाणवू लागली असून गॅस सिलेंडरच्या दरवाढीसोबतच खाद्यतेलाच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडू लागले आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांत जळगाव जिल्ह्यात खाद्यतेलाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे आयातीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्याचा थेट परिणाम दरांवर होत आहे.
सध्या बाजारात सोयाबीन तेलाच्या १५ लिटरच्या डब्याची किंमत २३०० रुपयांवरून वाढून सुमारे २३७५ ते २४५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. शेंगदाणा तेलाच्या डब्याचे दरही वाढून २६०० ते २७०० रुपयांपर्यंत गेले आहेत. तसेच सनफ्लॉवर तेलाच्या किमतीतही वाढ होत २४७० ते २५०० रुपयांपर्यंत दर पोहोचल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
सध्या बाजारात उपलब्ध असलेला जुना साठा असल्यामुळे दर काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचे व्यापारी सांगतात. मात्र भविष्यात आयात कमी झाली किंवा साठेबाजी वाढली तर खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती खर्चावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून, सरकारने साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्याची मागणीही पुढे येत आहे.









