---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात पिंप्री मोंढाळे येथे तब्बल दोन एकर सरकारी गायरान जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे खासगी मालकीची दाखवून हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी कठोर भूमिका घेत तत्कालीन सात ग्रामसेवक, आठ सरपंच तसेच अन्य ४० भूमाफियांवर फौजदारी आणि प्रशासकीय कारवाईचे आदेश दिले आहेत. महसूल विभागाला संबंधित जमीन पुन्हा सरकारी ताब्यात घेऊन अतिक्रमणे हटविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी केला. साडेचार वर्षांच्या सातत्यपूर्ण संघर्षानंतर अखेर प्रशासनाने या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेतली. पाटील यांनी बनावट व्यवहारांची कागदपत्रे आणि पुरावे प्रशासनासमोर मांडल्यानंतर एरंडोल उपविभागीय अधिकाऱ्यांच्या समितीकडून चौकशी करण्यात आली.
चौकशीत सरकारी गायरान जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून ती खासगी मालकीची दाखविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. चौकशी अहवालानुसार, पिंप्री मोंढाळे येथील गट क्रमांक १४० आणि सर्व्हे क्रमांक ८४ मधील सरकारी गायरान जमिनीचे बनावट नमुना क्रमांक ८ चे उतारे तयार करण्यात आले होते. या उताऱ्यांवर सक्षम अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि शासकीय शिक्क्यांचा वापर करून जमीन खासगी मालकीची असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. त्यानंतर संबंधित नोंदी ग्रामपंचायत दप्तरी घेण्यात आल्या.
गटविकास अधिकारीही दोषी
तक्रारदार गुलाबराव पाटील यांनी आरोप केला की, हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. काही संशयितांनी यंत्रणेचा गैरवापर करून पोलीस दलातील काही व्यक्तींशी संगनमत साधत त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले. संघर्षाच्या काळात त्यांना धमक्याही देण्यात आल्या, मात्र त्यांनी माघार घेतली नाही. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समितीला सहकार्य न केल्याबद्दल गटविकास अधिकारी संजय तुकाराम मोरे यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषी आढळलेल्या संबंधित ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी आणि इतर भूमाफियांविरोधात लवकरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
संशयितांमध्ये यांचा समावेश
या प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवक डी. बी. पाटील, महेंद्र सोनवणे, एन. आर. चंदरै, दिवंगत दिलीप पाटील, राजेंद्र सोनवणे, हरिभाऊ मारवडकर आणि जगदीश बाविस्कर यांच्यासह तत्कालीन सरपंच राजेंद्र भीमराव पाटील, कैलास राघो पाटील, मीराबाई पाटील, गंभीर नथ्थू पाटील, लताबाई पाटील, राजेंद्र भगवान पाटील, विजय भाऊराव पाटील, गोकुळ विसावे आणि प्रभारी सरपंच पुष्पा पाटील यांची नावे समोर आली आहेत.








