---Advertisement---
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, जळगाव शहरात नागरिकांची दैना उडू नये यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील रस्ते दुरुस्ती, धोकादायक झाडे हटवणे आणि प्रलंबित विकासकामांबाबत महापौरांनी प्रशासकीय यंत्रणेला ‘डेडलाईन’ देत पावसाळापूर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
महापौरांच्या दालनात बांधकाम विभागाची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी शहरातील नागरी सुविधांच्या सद्यस्थितीवर नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेऊन महापौरांनी खालील प्रमुख मुद्द्यांवर भर दिला:
खड्डेमुक्त जळगावचे उद्दिष्ट: शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत गल्ल्यांमधील खड्डे तातडीने बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे खड्ड्यांत पाणी साचून अपघात होऊ नयेत, यासाठी डागडुजीचे काम प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
धोकादायक झाडे आणि फांद्यांचा प्रश्न: वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळून जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी, रस्त्यांवरील धोकादायक झाडे आणि विजेच्या तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्या तातडीने छाटण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रस्तावांना मिळणार गती: नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील रस्ते आणि गटारींच्या कामांचे जे प्रस्ताव दिले आहेत, त्यांचे ‘इस्टिमेट’ (अंदाजपत्रक) तयार करण्यास विलंब लावू नका, असे खडे बोल महापौरांनी अभियंत्यांना सुनावले.
या बैठकीला शहर अभियंता योगेश बोरोले, विद्युत विभाग प्रमुख संदीप मोरे यांच्यासह बांधकाम विभागातील सर्व कनिष्ठ व शाखा अभियंता उपस्थित होते. पावसाळ्यातील आपत्ती निवारण आणि शहरातील विकासकामे या दोन्ही आघाड्यांवर महापालिकेने आता कंबर कसली आहे.
“शहरातील नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास सहन करावा लागू नये, ही आमची प्राथमिकता आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही.”








