---Advertisement---
पैशासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो, याचं धक्कादायक उदाहरण बीड जिल्ह्यात समोर आलं आहे. पैशाच्या लालसेपोटी एका 21 वर्षीय विवाहित महिलेची केवळ वस्तूप्रमाणे खरेदी-विक्री करण्यात आल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. अवघ्या एका महिन्यात तिला तीन वेगवेगळ्या पुरुषांना विकण्यात आले आणि प्रत्येक वेळी तिच्यावर जबरदस्तीने लग्न लादण्यात आले. सततचा अपमान, मानसिक छळ आणि असह्य परिस्थितीमुळे अखेर त्या महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही घटना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात उघडकीस आली आहे. पीडित महिला मूळची लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. मात्र पतीकडून होणाऱ्या गैरवर्तनामुळे ती माहेरी, पालकांसोबत राहत होती. याच दरम्यान तिची ओळख पुण्यातील हडपसर परिसरात राहणाऱ्या महानंद नावाच्या एजंटशी झाली.
या एजंटने तिला चांगले स्थळ मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि पुण्यात नेले. मात्र तिथे नेल्यानंतर त्याने पाच लाख रुपये घेऊन अमर काळभोर नावाच्या व्यक्तीसोबत तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा आरोप आहे. पण यातूनही तिची सुटका झाली नाही.
लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांत तिला पुन्हा पळवून नेण्यात आले आणि दुसऱ्या व्यक्तीकडे सुमारे साडेचार लाख रुपयांत विकण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर 4 मार्च 2026 रोजी आष्टी तालुक्यातील कांडी बुद्रुक येथील एका व्यक्तीसोबत तिचे तिसरे लग्न लावून देण्यात आले. या व्यवहारातूनही सुमारे साडेचार लाख रुपये उकळण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
घटना इतक्यावर थांबली नाही. 6 मार्च रोजी आरोपीने त्या महिलेला पुन्हा फोन करून चौथ्या लग्नासाठी तयार राहण्यास सांगितल्याचे सांगितले जाते. सततची विक्री, जबरदस्तीची लग्ने आणि होणारा मानसिक छळ यामुळे ती पूर्णपणे खचली. पुढे काय होईल या भीतीने आणि अपमानाच्या भावनेने तिने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
सध्या त्या महिलेवर मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत आष्टी पोलिसांनी मुख्य आरोपी महानंद, पीडितेचा पती तसेच तुळजापूर येथील आणखी दोन जणांविरुद्ध मानवी तस्करी आणि फसवणुकीसंबंधी कलम 318 आणि 61 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शरद ज्ञानदेव भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे हे या प्रकरणातील आंतरजिल्हा रॅकेटचा तपास करत असून संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे.









