बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघड; जिल्ह्यातील १००४ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात

---Advertisement---

 

राज्यात बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून शिक्षकांची नियुक्ती केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याचा तपास वेगाने सुरू असून त्याचा विस्तार अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे आता स्पष्ट होत आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) प्रथमच संशयित शिक्षकांची सविस्तर यादी तयार केली आहे. या यादीत जळगाव जिल्ह्यातील तब्बल १००४ शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली असून पुढील तपासात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्राथमिक चौकशीत या शिक्षकांच्या नियुक्त्या तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आणि शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्या शेरा व स्वाक्षरीवर करण्यात आल्याचे आढळले आहे. मात्र या नियुक्त्यांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. नितीन बच्छाव यांच्या कार्यकाळात ८५ संशयास्पद शालार्थ ड्राफ्ट तयार करण्यात आल्याचा संशय असून भाऊसाहेब चव्हाण यांच्या काळात तब्बल ७४७ ड्राफ्ट भरले गेल्याचे तपासातून समोर येत आहे.

या प्रकरणाची सुरुवात नाशिकमधील भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यापासून झाली. त्यानंतर तपासाचा विस्तार होत गेला आणि जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच विविध शिक्षण संस्थांमधील अधिकारी व संस्थाचालकांपर्यंत संशयाची सुई पोहोचली. या घोटाळ्याशी संबंधित काही जणांवर यापूर्वीच कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात फिर्यादी असलेले भाऊसाहेब चव्हाण यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील तपासादरम्यान तयार करण्यात आलेली अधिकारी, शिक्षण संस्था आणि शिक्षकांची नावे असलेली यादी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठविण्यात आली आहे. या यादीत जळगावमधील ३५ पेक्षा अधिक शिक्षण संस्थांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अनेक नियुक्ती आदेशांवर संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याची नोंदही करण्यात आली आहे.

कागदपत्रांची पडताळणी करताना काही शालार्थ आदेशांमध्ये कर्मचारी नावे, शाळेची माहिती किंवा आदेश क्रमांक अधिकृत नोंदींशी जुळत नसल्याचेही समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये नियुक्ती प्रक्रियेची माहिती अपूर्ण असल्यामुळे संबंधित आदेश संशयास्पद मानले जात आहेत. तर काही आदेश वैध असल्याचेही तपासात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय काही कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी संभाजीनगर येथील दोन शिक्षण उपसंचालकांनीही निरीक्षण नोंदवले आहे. विविध शैक्षणिक संस्थांमधील नियुक्ती आदेश, शालार्थ ड्राफ्ट आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करताना अनेक विसंगती आढळल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---