---Advertisement---
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरसाडे तांडा येथे बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून तरुणाचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा प्रकार तपासात उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली असून न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
माहितीनुसार, संजय भिमा राठोड (वय 33, रा. वरसाडे तांडा नं. 3, ता. पाचोरा) यांनी आपल्या धाकट्या भावाबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचा भाऊ विजय भिमा राठोड (वय 25) हा 24 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर गेला होता. त्यानंतर 25 फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, मात्र त्याचा काहीही मागमूस लागला नाही.
याबाबत 26 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग रजिस्टर क्र. 15/2026 अंतर्गत विजय राठोड बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. त्यातून संजय परशुराम जाधव याच्यावर संशय व्यक्त झाला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता सुरुवातीला तो समाधानकारक माहिती देत नव्हता. मात्र पोलिसी चौकशीत अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
चौकशीतून उघड झाले की, आरोपी संजय जाधव याची पत्नी सोनाली जाधव आणि बेपत्ता झालेला विजय राठोड यांच्यात प्रेमसंबंध होते. या दरम्यान विजय राठोड याने सोनाली जाधव हिचे मोबाईलवर अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून तिच्यावर दबाव आणत असल्याची बाब संजय जाधवच्या लक्षात आली. या कारणामुळे संतप्त झालेल्या संजय जाधवने पत्नीच्या मदतीने विजय राठोडचा खून केल्याचे उघड झाले. गुन्हा लपविण्यासाठी त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहितीही तपासात समोर आली.
या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी संजय परशुराम जाधव आणि सोनाली संजय जाधव या दोघांना अटक केली. त्यांना पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करत आहेत.
ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर (पवार) तसेच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोउपनि विठ्ठल पवार, पोहेकॉ किरण ब्राम्हणे, अतुल पवार, अभिजित निकम, राहुल बेहरे, पांडुरंग गोरबंजार, अमोल पाटील, नामदेव इंगळे, भारत पाटील, दीपक अहीरे आणि सागर पाटील आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.









