---Advertisement---
नंदुरबार : शहरातील वावद रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्राजवळ २७ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मुख्य संशयितासह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल संजय गिरासे (वय २७, रा. डोंगरगाव, ता. शहादा) हा ११ मार्चला सकाळी सव्वादहाच्या सुमारास नंदुरबार-शहादा रस्त्यावरील कच्च्या रस्त्यावरून जात होता. या वेळी संशयित तुषार झिपासिंग गिरासे (रा. कमाणे, ता. शिंदखेडा) आणि त्याच्यासोबत असलेल्या चार ते पाच साथीदारांनी राहुलला अडविले. संशयितांनी लोखंडी रॉडने राहुलला मारहाण केली, तर इतर साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारून त्याला जखमी केले. या मारहाणीत राहुलचा मोबाइलदेखील फोडण्यात आला असून, त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
जखमी राहुल गिरासे याला उपचारासाठी नंदुरबार येथील छत्रपती मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेबाबत पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८ (२), १२६ (२), १८९ (१), १९१ (२), १९०, ३५१ (२) व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग परदेशी तपास करीत आहेत.








