---Advertisement---
नंदुरबार : शहरात किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेला जाणीवपूर्वक धार्मिक वादाचे स्वरूप देऊन सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन तरुणांना नंदुरबार शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अफवा पसरवून शहरात गैरसमज निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची धडक कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भुनेश मराठे यांच्या फिर्यादीवरून खोट्या अफवा पसरवणारे संशयित समीर खान शेर खान पठाण (वय २६, रा. पटेलवाडी), शाहरुख खान रहिम खान पठाण ऊर्फ मास (वय २९, रा. जुना बैल बाजार) आणि शेख शोएब शेख फारूक ऊर्फ माज (वय २६, रा. काली मशीदजवळ) या तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम १९२, ३५३(२) आणि ३ (५) अन्वये गु.र.नं. ३६६/२०२६ नुसार गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
धार्मिक वादाचे खोटे स्वरूप
मात्र, गु.र.नं. ३६३/२०२६ मधील साक्षीदाराने या वैयक्तिक वादाला धार्मिक वादाचे स्वरूप देऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामुळे शहरात काही काळ अफवा पसरली होती.
पोलिसांचे आवाहन
वैयक्तिक वादाला धार्मिक रंग देऊन शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता राखावी, असे आवाहन नंदुरबार शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय ?
मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज १३ मार्चला नाट्यमंदिरासमोर वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला होता. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध तक्रारी दिल्याने (गु.र.नं. ३६३/२०२६ व ३६४/२०२६) क्रॉस गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुळात या वादात कोणताही धार्मिक संदर्भनव्हता, असे स्वतः फिर्यादीने स्पष्ट केले होते.









