---Advertisement---
नागपूर : संपूर्ण जगावर सध्या युद्धाचे गडद सावट आहे. अनेक जण स्वार्थासाठी युद्धाचा वापर करून घेत आहेत. अशा स्थितीत भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. संघर्षाच्या या काळात विश्वशांतीसाठी पुढाकार घेणारा भारत हा एकमेव देश आहे. कारण ‘सर्वेपि सुखिनः सन्तू’ हे भारतीय तत्त्वज्ञानच या विकट परिस्थितीत विश्वाला तारणार असल्याचा विश्वास सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला.
विश्व हिंदू परिषद, विदर्भप्रांताच्या नवीन कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी जुना सुभेदार ले-आऊट येथील शारदा चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी गाझियाबाद येथील सच्चिदानंद नानकधामचे संत त्रिलोकदर्शन दासजी महाराज, अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे जितेंद्रनाथ महाराज. विहिंपचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे, प्रसिद्ध उद्योजक अनंतकुमारजी बन्सल, सुमितकुमार माहेश्वरी, दीपक तामशेट्टीवार, सुदर्शन शेंडे व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वार्थी हितसंबंध आणि वर्चस्वाची प्रखर इच्छा, हेच जगातील संघर्षाचे खरे कारण आहे. स्थायी शांती केवळ एकता, शिस्त आणि धर्माचे पालन केल्यानेच प्राप्त होऊ शकते. ही शक्ती केवळ भारताकडेच आहे, याची जाणीव जगाला आहे. त्यामुळे युद्ध संपविण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहत आहे.
सुमारे दोन हजार वर्षांपासून जगाने संघर्ष सोडविण्यासाठी अनेक विचारांवर प्रयोग केले आहेत. परंतु, त्यांना फारसे यश मिळाले नाही. भारत मानवतेच्या नियमाचे पालन करतो, तर इतर देश जंगलातील कायदे मानतात. आम्हाला आमच्या देवी-देवता आणि साधू-संतांकडून एक विचारधारा मिळाली आहे. सर्व धर्म संप्रदायांनी एकतेचा मंत्र विश्वाला दिला. उपासना पद्धती निराळी असेल, मार्ग निराळे असतील, तरी उपदेश सारखा आहे. भारतीय मानवतेचा कायदा मानतात तर उर्वरित जग शक्तीचा कायदा मानते, असे डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
डगमगणान्या जगाला आधार देण्याचे धर्माचे काम
धर्माचरणातून एका शक्तीचे निर्माण होते, असे सांगत सरसंघचालक पुढे म्हणाले, आज धार्मिक जागृतीची गरत आहे. संविधानातही आमच्या धार्मिक परंपरा आहे. समाज जागृत व्हावा आणि समाजाने एकमेकांशी जुळावे, ही यामागची संकल्पना आहे. आम्ही सर्व एक आहोत, हे मानण्यास कोणीही तयार नाही. त्यांच्याकडे विचारधारेचा अभाव आहे. संघर्षात काहीही अर्थ नाही. खरा अर्थ समन्वयातच आहे. आज कट्टरपथींमुळे संघर्ष वाढतो आहे. सर्व समान आहे, ही विचारधारा भारताकडे आहे. भारताची विचारधारा सर्वांना मानावी लागेल. आज जग विनाशाकडे जात आहे. डगमगणाऱ्या जगाला आधार देण्याचे काम धर्मच करू शकतो. ही ताकद भारताकडे आहे.
भारतात जन्म हे आपले भाग्य असून सारेच भारतीय सनातनी आहेत, असे त्रिलोकदर्शनदास हे भाषणात म्हणाले. तर रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षात विहिंपच्या भवनाचे भूमिपूजन होणे, हा उत्तम योग आहे. विहिंपचे कार्यालय हे ऊर्जा केंद्र आहे, असे प्रतिपादन जितेंद्रनाथ महाराज यांनी केले. समारंभाला राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, आमदार कृपाल तुमाने, संत-महंत, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असे राहणार कार्यालय
विश्व हिंदू परिषदेच्या या नवीन कार्यालयाचे बांधकाम सुमारे ४००० चौरस फुटांच्या प्रशस्त परिसरात करण्यात येत असून सहा मजली आधुनिक इमारतीचे नियोजन करण्यात आले आहे. या परिसरात पार्किंग सुविधेसह श्रीहनुमान मंदिर आणि श्रीगणेश मंदिराची उभारणीही करण्यात येणार आहे. नवीन इमारतीमध्ये कॉन्फरन्स हॉल, प्रवासी केंद्रीय व प्रांतीय पदाधिकाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, वसतिगृह तसेच संघटनेच्या विविध आयामांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहेत. याशिवाय वाचनालयाची सुविधा, बाहेरगावाहून वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यासाठी निवास व्यवस्था देखील राहणार आहे.









