---Advertisement---
शहादा शहरासह परिसरात घरफोडी आणि मोटारसायकल चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले असताना, स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मध्य प्रदेशातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नंदुरबार, अमरावती आणि मध्य प्रदेशातील एकूण १५ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी गुन्हे आढावा बैठकीत मालमत्तेविरुद्धच्या वाढत्या गुन्ह्यांबाबत गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी गुन्ह्यांच्या पद्धतीचा अभ्यास करून संशयितांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. दि. १३ जून २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे लोणखेडा परिसरात सापळा रचून विना नंबरच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी मोटारसायकल चोरीची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुक्राम कंगरसिंह वास्केल (वय २२, रा. झाई, ता. कुक्षी, जि. धार, मध्य प्रदेश) आणि संजय सुमलसिंह वसुनिया (वय २२, रा. बुराडिया, ता. कुक्षी, जि. धार, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. अधिक चौकशीत आरोपींनी नंदुरबार, अमरावती आणि मध्य प्रदेशातील विविध भागांत घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच चोरीच्या मोटारसायकली शहादा येथील कारखाना परिसरात लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ६ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या १४ मोटारसायकली आणि १ लाख ४८ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली.
या कारवाईमुळे शहादा पोलीस ठाण्यातील ७ आणि अमरावतीतील १ अशा एकूण ८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच शहादा पोलीस ठाण्यातील ६ आणि मध्य प्रदेशातील खेतिया पोलीस ठाण्यातील १ अशा एकूण ७ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
तपासादरम्यान आरोपी संजय वसुनिया याच्यावर गुजरात राज्यात मालमत्तेविरुद्धचे ९ गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, या टोळीतील एक साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या धडक कारवाईबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.









