---Advertisement---
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच महाविकास आघाडीच्या आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीच्या 59 आमदारांपैकी तब्बल 24 आमदार गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गैरहजर आमदारांमध्ये अनेक प्रमुख आणि प्रभावशाली नेत्यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत आगामी अधिवेशनात सरकारला कोणत्या मुद्द्यांवर घेरायचे, विरोधकांची रणनीती काय असणार आणि विविध राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे प्रमुख नेते उपस्थित होते.
मात्र बैठकीपासून दूर राहिलेल्या आमदारांमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, रोहित पवार, अभिजीत पाटील, संदीप क्षीरसागर आणि जयंत पाटील यांसारख्या नेत्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अनुपस्थितीमागे नेमके कारण काय, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
बैठकीला गैरहजर राहिलेल्या काही नेत्यांच्या अनुपस्थितीमागील कारणेही समोर आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटील हे वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. तर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे बैठकीला गैरहजर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ही बैठक उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. बैठकीला आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, नितीन राऊत, ज्योती गायकवाड, वरुण सरदेसाई यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार अलीकडेच शिंदे गटात गेल्यानंतर विरोधकांच्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे.









