---Advertisement---
खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दादर-भुसावळ खानदेश एक्सप्रेस नियमित सुरू करण्यासाठी करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून रेल्वे मंत्रालयाने 19003/19004 दादर-भुसावल खानदेश एक्सप्रेस 1 ऑगस्ट 2026 पासून आठवड्यातील सहा दिवस नियमित स्वरूपात चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार शुक्रवार वगळता आठवड्यातील उर्वरित सहा दिवस ही गाडी नियमित धावणार आहे. यामुळे मुंबई आणि खानदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या संदर्भात खासदार श्रीमती स्मिताताई उदय वाघ यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच धरणगाव तालुका प्रवासी मंडळानेही या मागणीसाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याचे मानले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत स्पेशल ट्रेन म्हणून चालवल्या जाणाऱ्या गाड्यांवर प्रवाशांना अतिरिक्त 25 ते 30 टक्के भाडे भरावे लागत होते. मात्र गाडी नियमित स्वरूपात सुरू झाल्यानंतर हे अतिरिक्त भाडे लागू राहणार नसल्याने प्रवाशांच्या खर्चातही बचत होणार आहे.
याशिवाय रेल्वे प्रशासनाने बोईसर आणि दहाणू रोड या स्थानकांवर अतिरिक्त थांबे मंजूर केले आहेत. त्यामुळे पालघर जिल्हा आणि परिसरातील प्रवाशांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
या निर्णयामुळे खानदेशातील प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. रेल्वे सेवा अधिक सुलभ आणि परवडणारी होणार असल्याने प्रवाशांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.









