---Advertisement---
संशोधनाच्या नावाखाली सामरिक तयारी? पाणबुडी युद्धासाठी चीनची मोठी हालचाल
जगभरात युद्धसदृश परिस्थिती निर्माण होत असताना चीनने आणखी एक मोठी रणनीती सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक लक्ष इराण-इस्रायल तणावाकडे असताना, चीन जगभरातील महासागरांच्या तळाचे नकाशे तयार करण्याच्या मोहिमेत सक्रिय झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. या घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
चीनकडून समुद्रतळ मॅपिंगचे काम नवीन नसून गेल्या अनेक दशकांपासून ते सुरू आहे. मात्र आता या मोहिमेला अधिक वेग देण्यात आल्याचे दिसून येत आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पाणबुडी (सबमरीन) ऑपरेशन्स अधिक प्रभावी करण्यासाठी चीन हा डेटा वापरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे भारत आणि हिंद महासागर परिसरात चीनची हालचाल वाढलेली दिसते. श्रीलंका, म्यानमार यांसारख्या देशांना आर्थिक मदत देत चीनने आपले प्रभावक्षेत्र वाढवले असून, त्या बदल्यात सागरी तळांवर प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मानले जाते.
चीनची संशोधन जहाजे प्रत्यक्षात हेरगिरीसाठी वापरली जात असल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे. विशेषतः भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या वेळी अशी जहाजे हिंद महासागरात आढळल्याने संशय अधिक बळावला आहे. त्यामुळे भारतीय नौदल चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, मलक्का सामुद्रधुनी परिसरात आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी भारत प्रयत्नशील असून, या भागातून चीनच्या सागरी हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची रणनीती आखली जात आहे. यामुळे भविष्यात चीनच्या आर्थिक आणि लष्करी पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
एकूणच, समुद्रतळ मॅपिंगच्या माध्यमातून चीन दीर्घकालीन सामरिक तयारी करत असल्याचे स्पष्ट होत असून, यामुळे जागतिक महासत्तांमधील स्पर्धा आणि तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.









