---Advertisement---
नवी दिल्ली : इराण युद्धामुळे बंद झालेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी जागतिक समुदाय सक्रिय झाला आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी ब्रिटनच्या नेतृत्वात शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारतासह ३५ प्रमुख देश यात सहभागी होणार आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितले की, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री परिषदेत आभासी पद्धतीने सहभागी होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टॉर्मर यांनी परिषदेसाठी भारताला विशेष निमंत्रण दिले. ब्रिटिश पंतप्रधानांनी हा मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू करणे, अडकलेल्या जहाजांची आणि खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे, जागतिक तेल आणि वायू पुरवठा साखळी पुन्हा सुरू करणे या विषयांवर होणाऱ्या बैठकीचे नेतृत्व ब्रिटिश परराष्ट्र सचिव इव्हेट कूपर करणार आहेत. बैठकीच्या पहिल्या टप्प्यात राजनैतिक आणि राजकीय पर्यायांवर चर्चा केली जाईल.









