---Advertisement---
कोची : सर्व जण एकत्रितपणे प्रयत्न करतील, तेव्हाच भारत विश्वगुरू बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सोमवारी केले. जोपर्यंत गोपी आणि गोप यांनी आपापल्या काठ्यांच्या मदतीने गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला नाही, तोपर्यंत भगवान श्रीकृष्णांनी तो उचलण्यासाठी आपली करंगळी वर केली नव्हती, अशी आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. राष्ट्र सुरक्षित असते, तेव्हाच वैयक्तिक जीवन सुखावह होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपण प्रगती केलीच पाहिजे; परंतु त्याच वेळी आपण राष्ट्रासाठीही कार्य केले पाहिजे, असे डॉ. मोहनजी भागवत यांनी एलामक्कारा येथील ‘भास्करीयम्’ येथे आयोजित ‘बालगोकुलम्’ च्या सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या बाल नेत्रशिबिराच्या उद्घाटनानंतर संबोधित करताना सांगितले.
वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन हे राष्ट्राच्या हितास पूरक असणे आवश्यक आहे. केवळ एक चांगला माणूस असणे पुरेसे नाही; आपल्या सद्गुणांचा उपयोग देशासाठी झाला पाहिजे. कोणतीही व्यक्ती किंवा कुटुंब एकाकीपणे सुखाने जगू शकत नाही. देशात सुरक्षितता असेल, तरच प्रत्येकाचे जीवन सुखकर बनते, असे डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले. श्री नारायण गुरू आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या विभूतींनी आपले अर्जित चारित्र्य आणि गुण समाजाला समर्पित केले.
जगाच्या कल्याणासाठी कष्ट आणि दुःखे स्वतःवर ओढवून घेणारे भगवान श्रीकृष्ण हे आमचे आदर्श आहेत. भगवंताचा जन्म तुरुंगात झाला आणि त्यांना आपल्या आई-वडिलांपासून दूर राहावे लागले. जगाच्या कल्याणासाठी श्रीकृष्ण पांडवांच्या पाठीशी उभे राहिले त्यांनी युद्धादरम्यान त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कोणत्याही वैयक्तिक सुखाची अपेक्षा केली नाही; उलट त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जागतिक हितासाठी वेचले, असे डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
केवळ चांगले असणे पुरेसे नाही…
काश्मीरचे लोक एकेकाळी संपत्ती आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत खूपच अग्रेसर होते. परंतु, सर्व काही मागे सोडून त्यांना आपल्या जन्मभूमीतून पलायन करावे लागले. केवळ चांगले असणे पुरेसे नाही, तर आपण समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, हा धडा आपल्याला यातून मिळतो, असे सरसंघचालक म्हणाले.









