---Advertisement---
धुळे जिल्ह्यातल्या शिरपुर शहरातील पहिली सहकारी तत्वावरील सुवर्णमहोत्सवी बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या दि. शिरपूर मर्चंट बँकेचा बँकिंग व्यवसाय परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. बँकेवर सध्या असलेल्या प्रशासक मंडळाला ठेवी स्विकारण्यास व परत देण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासक मंडळ बरखास्त होण्यासह बँकेवर अवसायक नेमला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक चंद्रजीत साहू यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले. प्रशासकांच्या नियुक्तीनंतरदेखील बँकेच्या आर्थिक परिस्थितीत कोणताही फरक दिसून येत नसल्यामुळे बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केल्याचे त्यांच्या आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे 2024 मध्ये बँक डबघाईला आल्याच्या कारणावरुन तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते व प्रशासकांची नियुक्ती रिझर्व्ह बँकेने केली होती. परंतु कर्जवसुलीमध्ये प्रशासकांनाही अपयश आल्याचे या निर्णयाने दिसून येत आहे.
संचालकांचा मनमानी कारभार, असुरक्षित कर्जांचे वितरण, कर्जवसुलीतील ढिलाई, कर्ज प्रकरणात अवाजवी सवलत देऊन बँकेचा व्यवसाय तोट्यात आणणे, बिनतारणी बेसुमार कर्जवाटप अशा कारणांमुळे शिरपूर मर्चंट बँक अडचणीत सापडली आहे. 2024 मध्ये ठेवीदारांनी बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ठेवी काढून घेण्याचा सपाटा लावल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. सहकार विभागाने त्याबाबत चौकशी करुन काही कोटी रुपयांची जबाबदारीही संचालकांवर निश्चित केली आहे. मात्र आता अवसायक नियुक्त केल्यानंतर वसुलीची परिस्थिती काय राहील, ठेवीदारांना वेळेत ठेवी परत मिळतील किंवा नाही, भाग धारकांच्या रकमांचे काय होईल असे अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत.









