---Advertisement---
भारतीय संगीतविश्वाला आपल्या मधुर आणि बहुआयामी आवाजाने समृद्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाची बातमी संगीतप्रेमींसाठी अत्यंत दु:खद ठरली आहे. त्यांच्या सुरांनी अनेक पिढ्यांचे आयुष्य समृद्ध केले असून, त्यांच्या गाण्यांतून निसर्गाची कोमलता, मातीचा सुगंध आणि जीवनातील भावस्पर्शी ओलावा अनुभवायला मिळत राहिला.
ज्येष्ठ उद्योजक अशोकभाऊ जैन यांनी आशाताईंसोबतच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, त्यांच्या सुरांत एक वेगळीच आत्मीयता होती. कविवर्य ना. धों. महानोर यांच्या काव्यात जशी मातीतली नाळ जिवंत भासते, तशीच ती आशाताईंच्या गाण्यांतूनही जाणवत असे.
त्यांनी पुढे सांगितले की, भवरलाल जैन यांच्या कार्यातून जसे जल, जमीन आणि शेतकऱ्यांशी घट्ट नाते जपले गेले, तसेच आशाताईंच्या सुरांतून जीवनाशी नाते अधिक दृढ झाले. त्यांच्या काही गाण्यांत शेती, निसर्ग आणि ग्रामीण जीवनाचा सुगंध दरवळत राहिला, जणू आपल्या मातीची ओळखच त्या सुरांत जपलेली होती.
दि. ७ सप्टेंबर १९९३ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे झालेल्या पहिल्या पदवीदान सोहळ्यात आशा भोसले आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना मानद डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली होती. त्या वेळी जैन हिल्स येथे झालेली त्यांची साधी, प्रेमळ आणि आत्मीय भेट आजही स्मरणात असल्याचे जैन यांनी सांगितले.
“त्यांच्या सुरांनी निसर्गाला आवाज दिला, मातीला अर्थ दिला आणि मनाला शांती दिली. अशा या स्वरसम्राज्ञी आज आपल्यात नसल्या तरी त्यांचे गीतरूपी अस्तित्व सदैव जिवंत राहील,” अशा भावपूर्ण शब्दांत अशोकभाऊ जैन यांनी श्रद्धांजली अर्पण केली.









