आशा भोसलेंच्या निधनानंतर पाकिस्तानात वेगळाच वाद; भारतीय गाणी व चित्रफित लावल्याने न्यूज चॅनल अडचणीत?

---Advertisement---

 

जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त केला जात असताना, पाकिस्तानमध्ये या प्रकरणाने वेगळाच वाद निर्माण झाला आहे. श्रद्धांजली वाहताना भारतीय गाणी आणि चित्रफिती दाखवल्यामुळे पाकिस्तानातील आघाडीचे न्यूज चॅनेल जिओ न्युज अडचणीत सापडले आहे.

पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणजेच PEMRA (पेमरा) ने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ‘जिओ न्यूज’ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीनुसार, चॅनेलने आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्तांकन करताना त्यांच्या गाण्यांचा आणि भारतीय चित्रपटांतील दृश्यांचा वापर केला, जो पाकिस्तानमधील विद्यमान नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या वादामागील मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानात 2018 पासून भारतीय चित्रपट, गाणी आणि इतर कंटेंटच्या प्रसारणावर बंदी लागू आहे. ही बंदी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लागू करण्यात आली होती. अशा परिस्थितीत, ‘जिओ न्यूज’ने श्रद्धांजलीच्या नावाखाली भारतीय कंटेंट प्रसारित केल्याने हा “न्यायालयाचा अवमान” असल्याचे पेमराने नमूद केले आहे.

या प्रकरणात पुढील कारवाईसाठी चॅनेलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 27 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास दंड, चॅनेलचे निलंबन किंवा परवाना रद्द करण्यासारख्या कठोर कारवाईची तरतूदही आहे.

दरम्यान, ‘जिओ न्यूज’ने या नोटिसीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जिओ न्यूज चॅनेलचे व्यवस्थापकीय संचालक अझहर अब्बास यांनी स्पष्ट केले की, एखाद्या महान कलाकाराच्या आयुष्यावर बातमी देताना त्यांच्या कार्याचा संदर्भ देणे ही पत्रकारितेची मूलभूत पद्धत आहे. आशा भोसले यांचे संगीत आणि कारकीर्द हीच त्यांची ओळख असल्याने त्यांच्या गाण्यांशिवाय श्रद्धांजली अपूर्ण ठरली असती, असे त्यांनी म्हटले.

यासोबतच त्यांनी आशा भोसले यांचे पाकिस्तानशी असलेले सांस्कृतिक नातेही अधोरेखित केले. त्यांनी नूर जेहान यांना आपली मोठी बहीण मानले होते, तसेच नुसरत फतेह अली खान यांच्यासोबतही त्यांनी काम केले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “कला आणि संगीत हे देशांच्या सीमांपलीकडे जाऊन लोकांना जोडणारे माध्यम आहे. संघर्षाच्या काळातही कलाकारांना अशा वादात ओढणे योग्य नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

या संपूर्ण प्रकरणावर पाकिस्तानातील राजकीय वर्तुळातूनही टीका होत आहे. शेरी रहमान यांनी पेमराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सांस्कृतिक अभिव्यक्तीवर अशा प्रकारे नियंत्रण आणणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---