---Advertisement---
शहरात वाढत्या ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी सायलेंसर मॉडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई सुरू केली आहे. सन २०२६ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानात मोठ्या आवाजाचे सायलेंसर वापरणाऱ्या वाहनचालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अनेक दुचाकी चालक सायलेंसरमध्ये बेकायदेशीर बदल करून मोठा आवाज निर्माण करतात, ज्यामुळे नागरिकांना त्रास होतो तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर अशा वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असून सन २०२५ मध्ये ८४० अपघातांची नोंद झाली आहे. त्यात सुमारे ४५० जणांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले असून, खालील बाबींवर कारवाई केली जात आहे:
बेकायदेशीर सायलेंसर वापरणारे वाहन
ट्रिपल सीट, हेल्मेट नसणे
मद्यपान करून वाहन चालविणे
रॉंग साईड ड्रायव्हिंग आणि ओव्हरस्पीड
वाहन चालवताना मोबाईलचा वापर
जळगाव जिल्हा ‘शून्य अपघात’ संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव पोलिसांनी नागरिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.









