---Advertisement---
नंदुरबार : धानोरा हा रस्ता खोदून ठेवलेल्या रस्त्यावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. धानोरा रस्त्यावर झायलो व मोटरसायकल यांच्यात धडक होवून झालेल्या अपघातात नवरदेवासह त्याच्या मित्राचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. तालुक्यातील लोय गावाजवळ हा अपघात घडला. खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, झायलो वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खडीच्या ढिगवर पलटी झाले. काही वेळानंतर वाहनाने पेट घेतला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे ता. नंदुरबार येथील रोहित आप्पा भिल (वय २२) याचा विवाह नवापूर तालुक्यातील एका गावात येत्या दि.३० एप्रिल रोजी होणार होते. या लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी रोहित भिल व त्याचा मित्र साजन संजय भिल (वय २२, रा. करजई (डामरखेडा) ता. शहादा) हे दोघे आज दि.२३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मोटरसायकल (क्र.जी.जे. ०५- बीआर ०४७२) ने शिंदे येथून धानोराकडे जात होते. सध्या नंदुरबार धानोरा रस्त्याचे काम सुरु असल्याने रस्ता खोदण्यात आला आहे. दरम्यान, नंदुरबार-धानोरा रस्त्यावरील लोय गावाजवळ नंदुरबारकडे येणाऱ्या झायलो (क्र. जीजे १६ बीबी १५५२) वाहनाने या मोटरसायकलीला धडक दिली. झायलो कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर उलट झाला.
या अपघातात मोटरसायकलीवरील दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी १२.३० च्या सुमारास रोहितचा तर २.३० च्या दरम्यान साजन याचा मृत्यू झाला. तसेच झायलोमधील अली खाटीक, जाहीर खाटीक, अन्सार खाटीक हे जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. झायलो चालक नाजील जमील पठान (रा. नवापूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
अपघातानंतर झायलो वाहन खडीच्या ढिगाऱ्यावर पलटी झाले. त्यानंतर वाहनाने पेट घेतल्याने ते जळून खाक झाले. वाहनाचे एसी सुरु असल्याने तसेच त्याचे इग्नीशन सुरु असल्याने गाडीने पेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नंदुरबार धानोरा या रस्त्याचे काम सुरु असल्याने रस्ता खोदण्यात आला आहे. रस्त्याच्या बाजूला खडीचे ढिग उभे करण्यात आले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.









