---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात सोशल मीडियावर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पारोळा तालुक्यातील शिरसमणी गावातील एका तरुणाने सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही बाब लक्षात येताच सामाजिक सलोख्याला धक्का बसू शकतो, अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पारोळा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित संशयिताला ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ रिपाइं (आठवले गट) आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने पोलिस प्रशासनाला संयुक्त निवेदन देण्यात आले.
महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तीमुळे समाजातील शांतता बिघडत असल्याचे नमूद करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









