राज्यात हवामानाचा ‘डबल अटॅक’! कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे पावसाचा कडाका; जळगावसाठी धोक्याचा इशारा

---Advertisement---

 

​जळगाव: महाराष्ट्रात सध्या निसर्गाचे दोन टोकाचे चेहरे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र भीषण उष्णतेच्या लाटेने होरपळत असताना, दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. हवामान विभागाने राज्यासाठी एकाच वेळी उष्णतेची लाट आणि पावसाचा असा दुहेरी इशारा दिला आहे.
​जळगाव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून शुक्रवारी तापमानाची नोंद ४३.३ अंश सेल्सिअस इतकी झाली होती. मात्र, जळगावकरांसाठी पुढचे ४८ तास अधिक कठीण असणार आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आगामी दोन दिवसांत जिल्ह्याचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
​दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून वाढत्या उष्णतेमुळे प्रशासनाने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.


​विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट
​केवळ जळगावच नाही, तर संपूर्ण विदर्भातही सूर्याचा कोप पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत अमरावती येथे सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला आणि वर्धा जिल्ह्यांतही तापमान ४४ अंशांच्या आसपास स्थिरावले आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ‘येलो अलर्ट’
​एकडे उत्तर महाराष्ट्र तापत असताना, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वातावरणात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने खालील जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे:
​पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
​मराठवाडा: परभणी, लातूर, नांदेड.
​या भागांत दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
​ बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. विशेषतः उन्हाचा चटका असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---