---Advertisement---
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गुरुवारी सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास मका पिकाच्या शेताला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. दगाजी देवराम पाटील व कल्पना दगाजी पाटील यांच्या शेतात लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सध्या सुरू असलेल्या प्रचंड उष्णतेसह कोरड्या वाऱ्यामुळे आग क्षणार्धात पसरली. कोरड्या झालेल्या मका पिकामुळे ज्वाळांनी काही मिनिटांतच मोठा परिसर वेढला. आगीची तीव्रता इतकी होती की दूरवरून धुराचे लोट स्पष्ट दिसत होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व नागरिकांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला.
दरम्यान, माहिती मिळताच अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शेताच्या आजूबाजूला नियंत्रणरेषा तयार करत पाण्याचा मारा सुरू केला. जवानांनी समन्वयाने काम करत काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले.
या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे.









