---Advertisement---
शहरात वाढत्या उष्णतेचा तडाखा लक्षात घेता जळगाव महानगरपालिकेने नागरिकांना दिलासा देण्यासाठी ‘वॉटर शॉवर’ उपक्रम हाती घेतला आहे. शनिवारी (दि. २५ एप्रिल) दुपारी शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाण्याची फवारणी करण्यात आली.
सध्या शहरातील तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेल्याने रस्ते तापून निघत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेकडून ही कार्यवाही करण्यात आली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत हा उपक्रम राबवण्यात आला.
दोन टँकरच्या मदतीने चित्रा चौक, कोर्ट चौक, नवीन बस स्थानक परिसर, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, नेहरू चौक आणि टॉवर चौक या प्रमुख ठिकाणी पाणी फवारण्यात आले. यामुळे रस्त्यांवरील तापमान काही प्रमाणात कमी होऊन परिसरात थंडावा निर्माण झाला. परिणामी, दुपारच्या कडक उन्हात प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आणि नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला.
या उपक्रमादरम्यान शहर अभियंता योगेश बोरोले, पर्यावरण विभागाचे अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित होते. पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता अशा प्रकारच्या उपाययोजना सुरू ठेवण्याचा विचार प्रशासन करत आहे.









