भुसावळच्या राजकारणात मोठा भूकंप! नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध;पदावर टांगती तलवार

---Advertisement---

 

भुसावळ शहराच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र जळगाव जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. या निर्णयामुळे भंगाळे यांचे नगराध्यक्षपद धोक्यात आले असून, त्यांच्यावर पद गमावण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

​भुसावळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. या अटीवर झालेल्या निवडणुकीत गायत्री भंगाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
​निवडणुकीवेळी भंगाळे यांनी भुसावळ प्रांताधिकाऱ्यांनी दिलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, या प्रमाणपत्राच्या वैधतेवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

​गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत प्रमोद सावकारे, रजनी सावकारे, संजय तायडे आणि राहुल तायडे यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर दीर्घकाळ सुनावणी चालल्यानंतर, समितीचे अध्यक्ष बोदरडे, सदस्य एस. एस. महाजन आणि एन. एस. रावते यांच्या समितीने अखेर हे प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निकाल दिला.

​नियमानुसार, राखीव जागेवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला सहा महिन्यांच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) सादर करणे बंधनकारक असते. मात्र, त्याआधीच समितीने मूळ प्रमाणपत्रच अवैध ठरवल्याने गायत्री भंगाळे यांचे पद आता धोक्यात आले आहे.


​नगराध्यक्षपद रिक्त होणार? जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांचे सदस्यत्व आणि पद रद्द होऊ शकते.
​सत्तासमीकरणे बदलणार: या निर्णयामुळे भुसावळ नगरपालिकेत आता नवीन राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्यता आहे.
​सावकारे गटाला बळ: मंत्री संजय सावकारे यांच्या गटासाठी हा निर्णय कायदेशीर लढाईतील मोठा विजय मानला जात आहे.
​या निकालामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आता गायत्री भंगाळे या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान देतात की त्यांना पद सोडावे लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---