ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

---Advertisement---

 

जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

जळगाव क्रिकेट लीग २०२६ चा बहुप्रतिक्षित ग्रॅण्ड फायनल सामना आज (रविवार) संध्याकाळी ६ वाजता जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर रंगणार आहे. अमळनेर सुहांस जायंटस आणि जळगाव कोगटा किंग्ज या दोन दमदार संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत अंतिम फेरी गाठलेल्या दोन्ही संघांमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, क्वालिफायर-२ सामन्यात जळगाव कोगटा किंग्जने जामनेर सातपुडा हिरोजवर मात करत फायनलमध्ये धडक मारली. छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेत्या आयशा खान यांच्या उपस्थितीत नाणेफेक पार पडली. जामनेर संघाचा कर्णधार शतायु कुलकर्णी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


जामनेर सातपुडा हिरोजकडून प्रद्युम्न महाजन याने संयमी खेळी करत नाबाद ६१ धावा केल्या, तर राम राठोडने २८ चेंडूत ४३ धावांची आक्रमक खेळी साकारली. क्रिषी नथानीने ३३ धावांचे योगदान दिल्याने संघाने २० षटकांत ५ बाद १६० धावा केल्या.
जळगाव कोगटा किंग्जकडून गोलंदाजीत सागर भावसार (२/३१) आणि मनिष चौहान (२/२५) यांनी प्रभावी मारा केला.
१६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जळगाव कोगटा किंग्जची सुरुवात खराब झाली. मात्र, ओम भोसले (३२ धावा) याने डाव सावरला. त्यानंतर कर्णधार जगदीश झोपे याने धडाकेबाज फलंदाजी करत २५ चेंडूत ६१ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर कोगटा किंग्जने अवघ्या १७ षटकांत ५ गडी राखून विजय मिळवला.


या सामन्यातील शानदार कामगिरीबद्दल जगदीश झोपे याला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. तसेच निखेलेश चौधरी आणि झोपे यांना विशेष पारितोषिकांनी गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण सोहळ्यास जैन इरिगेशनचे मानव संसाधन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व्ही. एम. भट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आता सर्वांचे लक्ष आज होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागले असून, अमळनेर सुहांस जायंटस की जळगाव कोगटा किंग्ज — कोण उंचावणार विजेतेपदाची ट्रॉफी, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---