---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथे भीषण पाणी समस्येने नागरिक हैराण झाले आहेत, दूषित, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या तापमान 44 अंशांवर पोहोचले असताना नागरिकांना शुद्ध पाण्याऐवजी घाणेरडे पाणी मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कासोदा ग्रामपंचायतीकडून वॉर्ड क्रमांक १, शेलार गल्ली, गढी भागात पुरवण्यात आलेले पाणी अत्यंत गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे, येथे आधीच 15 ते 20 दिवसातून एकदाच पाणीपुरवठा होत असून, तोही अशा निकृष्ट दर्जाचा होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कासोदा गावातील अनेक भागांत नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात शेवाळ, कचरा आणि दुर्गंधी असल्याचे दिसून येत आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य तर आहेच, पण दैनंदिन वापरासाठीही धोकादायक ठरत आहे. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असल्याने योग्य शुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा केला जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
पाणीपुरवठा होत असलेल्या गढूळ दूषित पाण्यामुळे गावात जलजन्य आजारांचा धोका वाढला असून, लहान मुले आणि वृद्धांमध्ये उलट्या, जुलाब आणि पोटदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचेही समोर आले आहे.
“आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो, तरी आम्हाला शुद्ध पाणी का मिळत नाही?” असा सवाल महिला वर्गाने उपस्थित केला आहे. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यरत आहे का, तसेच TCL पावडरचा वापर होतो का याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. स्थानिक आमदार अमोल दादा पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घालून तातडीने शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, तसेच निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.









