​जळगाव जिल्ह्याला “आरोग्य संपन्न” करण्यासाठी पालकमंत्र्यांचे जनआंदोलनाचे आवाहन

---Advertisement---

 

जळगाव, 27 एप्रिल – “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानाला जनआंदोलनाचे रूप देत प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. या अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
राज्यात 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आणि सहज उपलब्ध आरोग्य सेवा देणे हा आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करणे, तसेच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे हे अभियानाचे प्रमुख ध्येय आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम” पुरस्कार देऊन सकारात्मक स्पर्धा निर्माण केली जाणार आहे.


ग्रामपंचायत, महिला बचत गट, युवक मंडळे आणि स्थानिक संस्थांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश देताना पालकमंत्र्यांनी माता-बाल आरोग्य, लसीकरण, पोषण आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यास सांगितले. तसेच शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन यावर ठोस काम करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यात तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचल्याने उष्माघात आणि डिहायड्रेशनचा धोका वाढला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांनी शेतीची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत, अशीही सूचना देण्यात आली.


जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी लोकसहभागाशिवाय अभियान यशस्वी होणार नाही, असे सांगत आरोग्य सेवा अधिक गतिमान करण्यावर भर दिला. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर, जिल्हा शल्य चिकित्सक स्वप्निल सांगळे, तसेच विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---