---Advertisement---
पुणे – राज्यातील जनसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेत, महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा समावेश करण्याचा मानस असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी केली.
भारती विद्यापीठ दिमेड युनिव्हर्सिटी च्या 31 व्या स्थापना दिन समारंभात ते बोलत होते. या वेळी मंत्री अतुल सावे , कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम आणि कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी भारती हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना योजनेचे एकत्रित कार्यालय, अत्याधुनिक नेत्ररोग विभाग, नेत्रपेढी आणि आयव्हीएफ केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवांची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या योजनांद्वारे अधिकाधिक नागरिकांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगाने होणाऱ्या औद्योगिक विकासाचा उल्लेख करत कुशल व अकुशल मनुष्यबळाबरोबरच मजबूत आरोग्य यंत्रणेची गरज अधोरेखित केली.
डॉ. विश्वजीत कदम यांनी भविष्यात छत्रपती संभाजीनगर येथे भव्य शैक्षणिक संकुल उभारण्याची माहिती दिली, तर डॉ. शिवाजीराव कदम यांनी शिक्षणात तंत्रज्ञानासोबत मानवी मूल्ये जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी विश्वविद्यालयाने 200 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य करार केल्याची माहिती देत संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळाल्याचे सांगितले.









