---Advertisement---
जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय रेल्वेने प्रादेशिक वाहतूक सेवेत मोठा विस्तार करत महाराष्ट्राला मध्य प्रदेशमार्गे उत्तर प्रदेशशी जोडणाऱ्या दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये दररोज धावणारी बनारस–हडपसर (पुणे) आणि आठवड्यातून एकदा धावणारी अयोध्या–मुंबई (एलटीटी) गाडीचा समावेश आहे. विशेष म्हणजे अयोध्या–एलटीटी गाडी जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबणार असल्याने स्थानिक प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
उन्हाळ्याच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बनारस–हडपसर गाडीमुळे काशी विश्वनाथ धाम येथे जाणे सोयीचे होणार आहे, तर अयोध्या–मुंबई गाडी श्री राम मंदिर अयोध्या येथे जाणाऱ्या भाविकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवासी व भाविकांसाठी ही मोठी सुविधा ठरणार असून, थेट संपर्कामुळे गाड्या बदलण्याची गरजही उरणार नाही.
अयोध्या कॅन्ट–मुंबई अमृत भारत एक्सप्रेस अयोध्या कॅन्ट येथून सायंकाळी १६:४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री २०:३० वाजता मुंबई एलटीटी येथे पोहोचेल. या गाडीचे थांबे अयोध्या धाम, सुलतानपूर, प्रतापगढ, प्रयागराज, सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे असतील.
तसेच गाडी क्रमांक 02531 बनारस–पुणे अमृत भारत एक्सप्रेस बनारस येथून १६:४५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी ००:५५ वाजता हडपसर (पुणे) येथे पोहोचेल. या गाडीचे थांबे प्रयागराज, झाशी, बीना, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन आणि हडपसर येथे असतील.
या अमृत भारत गाड्यांमध्ये ८ स्लीपर आणि ११ सामान्य श्रेणीचे डबे, तसेच दिव्यांग व लगेज-गार्डसाठी स्वतंत्र डबे असतील. या गाड्या पूर्णपणे बिगर-वातानुकुलित असल्या तरी आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयींवर विशेष भर देण्यात आला आहे. सीसीटीव्ही देखरेख, आपत्कालीन टॉक-बॅक प्रणाली, एरोसोल-आधारित अग्निशमन व्यवस्था आणि पूर्णतः सीलबंद गँगवे यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.
पुश-पुल तंत्रज्ञानावर आधारित या गाड्यांमध्ये दोन्ही टोकांना इंजिन लावण्यात आले असून, त्यामुळे वेग आणि सुरक्षितता अधिक वाढणार आहे. एकूणच, या नव्या गाड्यांमुळे जळगावसह परिसरातील प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.









