‘थिंक ग्लोबली, प्लॅन नॅशनली, अॅक्ट लोकली’;पुणे येथील महापौरांच्या कार्यशाळेत ‘जळगाव पॅटर्न’चे सादरीकरण

---Advertisement---

 

जळगाव : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथे राज्यातील महापौर व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यशाळेत जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी सक्रिय सहभाग घेत शहरातील पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती सादर केली. त्यांच्या सहभागाबद्दल त्यांचा सन्मानही करण्यात आला.शिबिरातील दुसऱ्या सत्रात ‘विकसित महाराष्ट्र २०४७ साठी हवामान कृतीचे स्थानिकीकरण’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये बोलताना महापौर काळे यांनी वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली. जळगाव महानगरपालिकेमार्फत लवकरच ‘इको बस’ सेवा सुरू करण्यासोबतच शहरासाठी ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.


यावेळी त्यांनी विविध प्रकल्पांची माहिती देताना सांगितले की, घरांच्या छतांवर सोलर रिफ्लेक्टीव्ह पेंट वापरून तापमान कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच ‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षलागवड, ऑक्सिजन पार्कची उभारणी आणि शहरातील हरितक्षेत्र वाढवण्यावर भर दिला जात आहे. लोकसहभागातून स्वच्छता दूतांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचे नियोजन आहे.
“या प्रशिक्षणातून शहराच्या विकासासाठी नवे दृष्टिकोन आणि कामाची ऊर्जा मिळाली,” असे सांगत महापौर काळे यांनी “दृष्टिकोन जागतिक, नियोजन राष्ट्रीय आणि अंमलबजावणी स्थानिक पातळीवर” या विचाराचा पुनरुच्चार केला.
या कार्यशाळेला महापौर दीपमाला काळे यांच्यासह नगरसेविका ॲड. शुचिता हाडा उपस्थित होत्या.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---