---Advertisement---
जळगाव : जळगाव महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर महापालिकेने मुंबईस्थित अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड व त्यांच्या संचालकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
प्रभारी शहर अभियंता योगेश बोरोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 1996-97 ते 2001-02 या कालावधीत शहरातील रस्ते डांबरीकरणाच्या 256 कामांसाठी कंपनीला सुमारे 24.35 कोटी रुपयांचा मोबिलायझेशन व मटेरियल अॅडव्हान्स देण्यात आला होता. त्यापैकी 19.55 कोटी रुपये वसूल झाले असले तरी 4.79 कोटी रुपये अद्याप थकीत आहेत.
या थकीत रकमेवर व्याज, दंड आणि महापालिकेने पूर्ण केलेल्या अपूर्ण कामांचा खर्च धरून एकूण 42.60 कोटी रुपयांची वसुली बाकी असल्याचे समोर आले आहे. कंपनीने करारानुसार कामे पूर्ण न करता आणि अॅडव्हान्स रक्कम परत न करता महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी कंपनीचे संचालक राझू अंबालाल बाबरोट व इतर संबंधितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गुन्हा दाखल होताच हा तपास तातडीने आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.









