भारतातील मोबाईल फोनवर एकाच वेळी का वाजले सायरन?’तो’ मेसेज नेमका काय?

---Advertisement---

 

नवी दिल्ली : शनिवारी (२ मे) देशातील लाखो मोबाईल फोनवर अचानक सायरनसह ‘इमर्जन्सी अलर्ट’ मेसेज आल्याने अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र हा कोणताही धोका नसून केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या आपत्कालीन इशारा प्रणालीची (Emergency Alert System) चाचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दूरसंचार विभाग (DoT) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या संयुक्त विद्यमाने ही अत्याधुनिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ‘कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल’ (CAP) या आंतरराष्ट्रीय मानकावर आधारित ही यंत्रणा देशभरात टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जात आहे.


या चाचणीदरम्यान मोबाईलवर आलेला मेसेज हा फक्त टेस्ट अलर्ट होता. नागरिकांनी घाबरून न जाता अशा संदेशांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. या प्रणालीचा उद्देश नैसर्गिक आपत्ती, भूकंप, पूर, चक्रीवादळ यांसारख्या संकटांच्या वेळी नागरिकांना तात्काळ इशारा देणे हा आहे.
विशेष म्हणजे, या तंत्रज्ञानामध्ये सेल ब्रॉडकास्ट (Cell Broadcast) पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्या विशिष्ट भागातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांना एकाच वेळी अलर्ट पाठवता येतो. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वेळ न दवडता नागरिकांना सावध करता येणार आहे.


सध्या या प्रणालीची देशभर चाचणी सुरू असून, पुढील काळात इंग्रजी, हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांमध्येही असे अलर्ट संदेश मिळणार आहेत. आपत्तीच्या वेळी नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---