---Advertisement---
मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली असून स्ट्राईट ऑफ हॉर्मुझ या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवरून युनायटेड स्टेट्स आणि इराण यांच्यातील संघर्ष उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेने “Project Freedom” या नौदल मोहिमेची घोषणा केल्यानंतर इराणने आक्रमक भूमिका घेत थेट इशारा दिला आहे.
इराणच्या लष्कराने स्पष्ट केले आहे की, जर अमेरिकी सैन्याने होर्मूझ सामुद्रधुनीत प्रवेश करण्याचा किंवा जवळ येण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर हल्ला करण्यात येईल. हा इशारा अत्यंत गंभीर मानला जात असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “Project Freedom” अंतर्गत अडकलेल्या जहाजांना सुरक्षित मार्गदर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लष्करी हालचाली करण्याचे संकेत दिले आहेत. या मोहिमेसाठी सुमारे १५ हजार सैनिक, १०० हून अधिक विमाने, युद्धनौका आणि ड्रोन तैनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे, इराणने युद्ध टाळण्यासाठी १४ कलमी प्रस्ताव सादर केला असला तरी अमेरिकेकडून त्यावर अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. ट्रम्प यांनी हा प्रस्ताव “अस्वीकार्य” ठरवला आहे, त्यामुळे शांतता चर्चेची शक्यता सध्या तरी धूसर आहे.
याच पार्श्वभूमीवर इस्राईल आणि लेबनॉनमधील तणावही वाढला आहे. इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ले सुरूच ठेवले असून, काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही यात दुखापत झाली आहे. तसेच गाझामधील नियंत्रण क्षेत्र वाढवण्यासाठी “ऑरेंज लाइन” जाहीर केल्याची माहिती आहे.
दरम्यान, इराणच्या फार्स वृत्तसंस्थेनुसार, जास्क बेटाजवळ अमेरिकन नौदलाच्या जहाजावर क्षेपणास्त्रांनी हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि, या घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
एकूणच, होर्मूझ सामुद्रधुनीभोवती वाढत चाललेला तणाव केवळ प्रादेशिक नव्हे, तर जागतिक पातळीवर परिणाम करणारा ठरू शकतो. तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या या मार्गावर संघर्ष उभा राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसू शकतो.









