---Advertisement---
जळगाव: एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे लक्ष विचलित करून त्यांचे एटीएम कार्ड चलाखीने बदलून खात्यातून पैसे लांबवणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीला धुळे येथून ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून २ लाख ३१ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
२६ मार्च २०२६ रोजी जळगाव शहरातील बेंडाळे चौक परिसरातील एसबीआय (SBI) एटीएममध्ये एक तक्रारदार पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांचे लक्ष विचलित करून त्यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलले. त्यानंतर आरोपीने धुळे, नंदुरबार आणि मालेगाव अशा विविध शहरांतील एटीएममधून तक्रारदाराच्या खात्यातून एकूण २ लाख ३१ हजार रुपये काढून फसवणूक केली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली.
तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी धुळे येथे सापळा रचून शेख हबीब शेख नवाब (वय ५४, रा. लाला सरदार नगर, धुळे) याला ताब्यात घेतले. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या गुन्ह्यात सहभागी असलेला दुसरा आरोपी सैय्यद कमालुद्दीन खान (वय ३५, रा. साकीनाका, अंधेरी, मुंबई) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, या फरार आरोपीवर मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील कांदिवली, कामोठे, कळंबोली, वाशी यांसारख्या ठिकाणी फसवणुकीचे १० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, प्रवीण मांडोळे, संदीप पाटील, हरिलाल पाटील, राहुल बैसाणे, राहुल कोळी आणि विलास गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.
नागरिकांना आवाहन: एटीएममध्ये पैसे काढताना अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका आणि आपला पिन किंवा कार्ड कोणालाही देऊ नका, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आ









