बाजार समितीचे राजकारण तापले; अविश्वास ठरावावर पेच कायम

---Advertisement---

 

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून सभापती सुनिल महाजन यांच्या विरोधातील अविश्वास ठरावामुळे पेच निर्माण झाला आहे. १२ संचालकांनी एकत्र येत २७ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला असला, तरी आठवडा उलटूनही याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी श्यामकांत सोनवणे यांना पदावरून हटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महाजन आता स्वतःच त्याच राजकीय संकटात सापडल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे अविश्वासाची नामुष्की टाळण्यासाठी ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना महाजन यांनी अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस मिळाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, राजकीय वर्तुळात वेगळ्याच हालचाली सुरू असल्याचे दिसते. अविश्वास प्रस्ताव आणणारे सर्व १२ संचालक सध्या शहरातच ठाण मांडून असून, महाजन यांच्या पुढील निर्णयाची वाट पाहत आहेत.


या संपूर्ण घडामोडींमध्ये भारतीय जनता पार्टी च्या वरिष्ठ नेत्यांनी स्वतःला दूर ठेवल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच उपनिबंधकांकडून अपेक्षित असलेली कारवाईही अद्याप झालेली नाही.
महाजन यांना अद्याप नोटीस न मिळाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---