---Advertisement---
राहाता: नाशिक येथील अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी भोंदू अशोक खरात याला आज राहाता सत्र न्यायालयात कडक पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले. जमीन खरेदी आणि अवैध सावकारी प्रकरणी शिर्डी पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आज दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला.
सरकारी वकील ॲड. गौरव बोर्डे आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी न्यायालयाला सांगितले की, हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपी खरात याने विविध पतसंस्थांमध्ये अनेक बेनामी खाती उघडल्याचे तपासात समोर आले आहे. जमीन खरेदीसाठी वापरलेली ५ कोटी ५२ लाख रुपयांची अवाढव्य रक्कम नेमकी कुठून आली? व्याजाचे पैसे कोणी कोणी वाटून घेतले? याचा तपास करणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणातील दुसरी आरोपी आणि खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून, तिच्या शोधासाठी अशोक खरातची पोलीस कोठडी मिळणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
सुनावणीदरम्यान अशोक खरात गुलाबी टी-शर्ट आणि वाढलेल्या दाढीत खाली मान घालून स्तब्ध उभा होता. जेव्हा न्यायाधीशांनी त्याला “काही सांगायचे आहे का?” असे विचारले, तेव्हा त्याने केवळ मान हलवून “नाही” असे उत्तर दिले.
खरातच्या वकिलांनी असा दावा केला की, जमीन व्यवहाराची पूर्ण रक्कम फिर्यादीच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. फिर्यादीने स्वतः कर्ज फेडले नसल्याने आणि नाशिकमधील गुन्ह्याचा संदर्भ घेऊन हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच १८ मार्चपासून खरात हा SIT च्या ताब्यात असल्याने पत्नी फरार असल्याचा मुद्दा चुकीचा असल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले.
सध्या न्यायालय या दोन्ही बाजूंचा विचार करून पोलीस कोठडीबाबत काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









