---Advertisement---
ताडे (ता. एरंडोल) येथे आयोजित हळदी समारंभादरम्यान गावठी कट्यासह (अग्निशस्त्र/पिस्तूल) फिरणाऱ्या एका युवकाला कासोदा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एक जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ मे रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता हळदी समारंभ सुरू असताना काही नागरिकांच्या निदर्शनास आले की एक युवक कमरेला गावठी कट्टा लावून फिरत आहे. याबाबत उपस्थितांनी त्याला विचारणा केली असता, तो गर्दीचा फायदा घेत पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून लखन प्रकाश वाघ (रा. परशोडे, ता. पाचोरा) याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला कासोदा पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्याच्याविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी व कासोदा पोलिस स्टेशनच्या पथकाने केली.









