हुंड्याच्या लालसेपोटी 23 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर

---Advertisement---

 

अहिल्यानगर: सुखी संसाराची स्वप्ने उराशी बाळगून सासरी आलेल्या एका २३ वर्षीय निष्पाप विवाहितेचा हुंड्याच्या लालसेपोटी अत्यंत वेदनादायक अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या अमानुष शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून प्रिया शुभम ढगे या विवाहितेने विहिरीत उडी मारून आपले आयुष्य संपवले. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना राहता तालुक्यातील एकरुखे गावात घडली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, घर बांधण्यासाठी माहेरून ४ लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून प्रियाचा छळ सुरू होता. प्रियाचा नवरा शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे हे तिचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. इतकेच नव्हे, तर तिला अनेकदा उपाशीपोटी ठेवले जात असल्याची धक्कादायक माहितीही तपासात समोर आली आहे. २०२४ पासून सुरू असलेला हा छळ दिवसेंदिवस असह्य झाल्याने अखेर प्रियाने टोकाचे पाऊल उचलले.


प्रियाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून एकरुखे गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत मृत प्रियाचा नवरा शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे या तिघांनाही अटक केली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक ‘सुसाईड मेसेज’
आत्महत्या करण्यापूर्वी प्रियाने आपल्या नातेवाईकांना पाठवलेला शेवटचा मोबाईल मेसेज अत्यंत हृदयद्रावक आहे. “मी खूप सहन केलं, आता मला काहीच नको आहे. माझी श्रेया (मुलगी) माझ्या जवळ नाही, मी तिला खूप मिस करतेय,” असे तिने या संदेशात म्हटले आहे. सासरच्या वागणुकीमुळे आणि पतीच्या प्रेमाअभावी आपण हे पाऊल उचलत असल्याचे तिने नमूद केले. “शुभमला सांगा, करा मजा आता, मी गेले तुमच्या लाईफमधून,” असा उद्विग्न सवालही तिने आपल्या शेवटच्या संदेशात उपस्थित केला आहे.

हुंड्याच्या लालसेपोटी अजून किती निष्पाप जीव जाणार? असा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---