---Advertisement---
शहादा:- राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसरात आज निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या मुसळधार पावसासोबतच जोरदार गारपीट झाल्याने पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली. उन्हाच्या चटक्यापासून सुटका मिळवण्यासाठी आलेल्या पर्यटकांना या अनपेक्षित हवामानामुळे सुरक्षित ठिकाण शोधताना मोठी कसरत करावी लागली.
सुटीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांना या मुसळधार पावसाने आणि गारांनी झोडपून काढले. आडोसा शोधण्यासाठी पर्यटकांची एकच धावपळ उडाली. विशेषत लहान मुले आणि वृद्ध पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवताना नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागली. रस्ते निसरडे झाल्यामुळे आणि दृष्यमानता कमी झाल्यामुळे घाटातील वाहतूकही काही काळ मंदावली होती.
या पावसामुळे आणि गारपिटीमुळे तोरणमाळच्या तापमानात कमालीची घट होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. पर्यटकांना उन्हापासून दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या या संकटामुळे स्थानिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला असून परिसरातील शेती पिकांचेही नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.









