---Advertisement---
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. येत्या ३० मे रोजी आंतरवाली सराटी येथे भरउन्हात, मंडप न टाकता आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. “या उपोषणादरम्यान मी पाणीही घेणार नाही, जे होईल ते होईल. आता वेदनांचा काहीही विचार मी करणार नाही,” असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटलांनी घेतला आहे.
उष्माघाताने बळी गेला तर फडणवीस जबाबदार!
मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “३० मे रोजीच्या कडक उपोषणात उष्माघाताने जर माझा बळी गेला, तर त्याला केवळ आणि केवळ मुख्यमंत्री (उपमुख्यमंत्री) देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील,” असे जरांगे म्हणाले. फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष भरलेला असून त्यांना मराठ्यांवर अन्याय करायचा आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला.
’सरकारला गरजेपेक्षा जास्त वेळ दिला’
सरकारवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले की, आपण सरकारला पाहिजे त्यापेक्षा खूप जास्त वेळ दिला आहे. २९ मे रोजी या गोष्टीला १० महिने पूर्ण होत आहेत. “गोरगरीब मराठ्यांच्याच लेकरांवर का अन्याय केला जातोय? जर आपल्या समाजाला काही मिळत नसेल, तर आपल्याला कठोर पाऊल उचलावेच लागेल. एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझ्या जीवाचा तुकडा पडेल, या भूमिकेवर मी आलो आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.









