---Advertisement---
कर्नाटकच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस हायमांडने अखेर कर्नाटकात नेतृत्वबदलाचा निर्णय घेतल्यामुळे आता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
’ब्रेकफास्ट’ बैठकीत मोठी घोषणा
आज सकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी (कावेरी निवास) आयोजित मंत्रिमंडळाच्या ब्रेकफास्ट बैठकीत सिद्धरामय्या यांनी स्वतः आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याची अधिकृत घोषणा मंत्र्यांसमोर केली. दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींच्या बैठकीनंतर आणि राहुल गांधी यांच्या थेट सूचनेनंतर सिद्धरामय्या यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
या बैठकीत अत्यंत भावनिक वातावरण पाहायला मिळाले. निर्णय जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांचे पाय छूऊन आशीर्वाद घेतले आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. सिद्धरामय्या आज दुपारी ३ ते ३:३० वाजेच्या सुमारास राजभवनावर जाऊन आपला अधिकृत राजीनामा सादर करणार आहेत.
काय आहे काँग्रेसचा ‘समन्वय फॉर्म्युला’?
२०२३ मध्ये कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हापासूनच सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. नुकतीच सरकारने ३ वर्षे पूर्ण करत आणल्यामुळे डी. के. शिवकुमार यांच्या समर्थकांकडून सातत्याने दबाव वाढवला जात होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांना सन्मानाने बाजूला करण्यासाठी काँग्रेस हायमांडने एक विशेष फॉर्म्युला तयार केला आहे:
सिद्धरामय्या यांना केंद्रात स्थान: सिद्धरामय्या यांना राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून, केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
मुलाला उपमुख्यमंत्रीपद?: तडजोडीचा भाग म्हणून सिद्धरामय्या यांच्या मुलाला राज्य मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतही काँग्रेस वर्तुळात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.
डी. के. शिवकुमार लवकरच घेणार शपथ
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर आता ‘ट्रबलशूटर’ म्हणून ओळखले जाणारे डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून लवकरच शपथ घेतील. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (CLP) आगामी बैठकीत त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाईल. या घडामोडींमुळे संपूर्ण कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून शिवकुमार यांच्या समर्थकांनी बंगळूरूमध्ये जल्लोष सुरू केला आहे.









