---Advertisement---
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे “हॉटेल ग्रामपंचायत”च्या मालकीण रोहिणी निलेश पाराध्ये (वय 25) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे ब्रह्मपुरी परिसरात खळबळ उडाली आहे.
पती निलेश पाराध्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी साडेदोनच्या सुमारास हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाकघरात रोहिणी यांनी पत्र्याच्या लोखंडी अंगलाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे आढळले. घटनेनंतर त्यांना तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रोहिणी पाराध्ये आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर सक्रिय होते. सामाजिक विषयांसह खाद्यपदार्थांवरील रील्समुळे दोघांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती. याच लोकप्रियतेच्या माध्यमातून त्यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील ब्रह्मपुरी येथे “हॉटेल ग्रामपंचायत” हा व्यवसाय सुरू केला होता.
व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू असताना आणि नव्या शाखेची तयारी सुरू असतानाच रोहिणी यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.









