‘माझी प्रतिमा मलिन करण्याचा कट’ मानपूर प्रकरणात न्यायालयाचा निर्णय माझ्यासाठी दिलासादायक : एकनाथ खडसे

---Advertisement---

 

मानपूर महार वतन जमीन प्रकरणात न्यायालयाने दिलेला अटकपूर्व जामीन हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे. या प्रकरणात राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ खडसे म्हणाले की, सुमारे २४ वर्षांपूर्वी झालेल्या जमीन व्यवहारासंदर्भात अचानक गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात महार वतन जमीन हडपल्याचा, कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा तसेच व्यवहारादरम्यान पैसे न दिल्याचा आरोप करण्यात आला. यासोबतच ॲट्रॉसिटी कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी आपण न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली असल्याचे खडसे यांनी सांगितले. “२४ ते २५ वर्षांनंतर गुन्हा दाखल होणे संशयास्पद वाटते. यामागे राजकीय हेतू असल्याचे दिसते,” असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवल्याचा दावा त्यांनी केला.

तसेच, संबंधित प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्याचा संदर्भ लागू होत नसल्याचेही न्यायालयाने नमूद केल्याचे खडसे म्हणाले. २००२ मध्ये व्यवहार झाल्यानंतर अनेक वर्षे कोणतीही तक्रार करण्यात आली नव्हती. त्यामुळे तक्रारीत तथ्य नसल्याचे न्यायालयाच्या निरीक्षणातून स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, विरोधकांकडून आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही खडसे यांनी केला. “माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करून राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, अशा कारवायांमुळे माझी प्रतिमा खराब होणार नाही,” असे ते म्हणाले. पुढील काळात न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---