हॉटेलमध्ये भीषण अग्नितांडव; जीव वाचविण्यासाठी इमारतीवरून मारल्या उड्या, 21 जणांचा मृत्यू, अनेक परदेशी नागरिकांचा समावेश….

---Advertisement---

 

देशाची राजधानी दिल्ली आज एका भीषण दुर्घटनेने हादरली. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील एका हॉटेल आणि रेस्टॉरंट असलेल्या इमारतीला बुधवारी सकाळी भीषण आग लागून किमान 21 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव पथकांनी 40 हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढले असून अनेक जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

मालवीय नगरमधील हौज राणी परिसरातील अरुंद गल्लीत असलेल्या पाच मजली इमारतीत ही दुर्घटना घडली. तळमजल्यावर रेस्टॉरंट तर वरच्या मजल्यांवर हॉटेल सुरू होते. आग लागली त्यावेळी इमारतीत 40 ते 50 हून अधिक लोक उपस्थित होते. बहुतांश नागरिक झोपेत असल्याने सुरुवातीला अनेकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. काही मिनिटांतच धूर आणि ज्वाळांनी संपूर्ण इमारत वेढल्याने परिस्थिती गंभीर बनली.

सकाळी सुमारे 8.50 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने अनेक अग्निशमन बंब, पाण्याचे टँकर आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. आग इतक्या वेगाने पसरली की अनेक जणांना जीव वाचवण्यासाठी खिडक्यांतून उड्या माराव्या लागल्या. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात मदत करत जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. काही व्हिडीओंमध्ये नागरिक इमारतीच्या वरच्या मजल्यांवरून मदतीसाठी आरडाओरड करताना आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खाली उड्या मारताना दिसत आहेत. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या अनेक व्यक्ती परदेशी नागरिक होते. ते दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मृतांमध्ये आणि जखमींमध्ये परदेशी नागरिकांची संख्या लक्षणीय असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ती तळमजल्यावरील रेस्टॉरंट परिसरातून सुरू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. काही प्राथमिक अहवालांनुसार इमारतीत सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याची शक्यता तपासली जात आहे.

या दुर्घटनेनंतर दिल्ली प्रशासन, अग्निशमन विभाग आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी तैनात असून मृतांची ओळख पटविणे, जखमींवर उपचार करणे आणि आगीच्या कारणांचा शोध घेणे यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---