---Advertisement---
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात बारडोलीजवळील उवा गाव परिसरात भीषण अपघात घडला असून महाराष्ट्र नोंदणीच्या दोन बसांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात किमान पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गुजरात मधील या भीषण अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बसांचा वेग जास्त असल्याने ओव्हरटेक करताना एकमेकांना जोरदार धडक झाली हि धडक अत्यंत भीषण होती. या धडकेनंतर एक बस रस्त्यावर पलटी झाली. त्यानंतर पलटी झालेल्या बसला आग लागल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. काही क्षणांतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.
आगीमुळे बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. तर दुसऱ्या बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच बारडोली अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.
अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनाकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.









