---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील रेल गावातील १२ वर्षीय गणेश नवल पाटील यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गणेशच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाला नव्याने गती दिली असून अडीच महिन्यांपूर्वी पुरण्यात आलेला गणेशचा मृतदेह आज प्रशासनाच्या उपस्थितीत जमिनीतून बाहेर काढण्यात आला.
धरणगाव तालुक्यातील रेल गावात १५ मार्च रोजी क्रिकेट खेळत असताना गणेशचा मृत्यू झाला होता. मात्र हा मृत्यू नैसर्गिक नसून जुन्या वादातून मित्राने छातीत बॅट मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गणेशचे वडील नवल पाटील यांनी केला आहे. न्याय मिळावा यासाठी त्यांनी गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ पोलीस ठाण्यापासून ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला होता.
या पार्श्वभूमीवर फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक, पोलीस अधिकारी आणि तहसील प्रशासनाच्या उपस्थितीत गावाजवळील नदीकाठी पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया प्रशासनाच्या देखरेखीखाली पार पडली.
मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी तो धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र, एकुलत्या एक मुलाचा सांगाडा पाहून वडील नवल पाटील यांना अश्रू अनावर झाल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले.
आता शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालातून गणेशच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता असून या प्रकरणामागील सत्य काय आहे, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









