वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक; अभियंता उशिराने आल्याने संताप, बाम्हणे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन….!

---Advertisement---

 

शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील महावितरण उपकेंद्र कार्यालयावर शेतकऱ्यांनी विविध प्रलंबित प्रश्नांसाठी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. उबाठा शिवसेनेचे धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

शेतकरी निवेदन देण्यासाठी महावितरण कार्यालयात पोहोचले असता संबंधित अभियंता कार्यालयात अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट अभियंत्यांच्या दालनात ठिय्या मांडला. यावेळी “शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे”, “८ तास वीज मिळालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

सुमारे तासाभरानंतर अभियंता कार्यालयात दाखल झाल्यानंतर शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा नियमित मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

यानंतर शानाभाऊ सोनवणे व शेतकरी प्रतिनिधींनी दोंडाईचा येथे जाऊन महावितरणचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पाटील यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदनात कृषी पंपांना किमान ८ ते १० तास सलग वीजपुरवठा, अनियोजित भारनियमन बंद करणे, जळालेले ट्रान्सफॉर्मर २४ ते ४८ तासांत बदलणे, कमी दाबाचा प्रश्न सोडवणे, नवीन कृषी वीज जोडण्या मंजूर करणे, स्वतंत्र व मजबूत वीजवाहिन्या उभारणे, चुकीची व अवाजवी वीज बिले रद्द करणे तसेच नैसर्गिक आपत्तीनंतर तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी शानाभाऊ सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. या आंदोलनात परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---